काँग्रेसतर्फे जिल्ह्यात तत्काळ दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी

WhatsApp Image 2019 05 14 at 4.37.08 PM

जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला असता जिल्ह्यांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आल्याने जिल्ह्यात तत्काळ दुष्काळी योजना लागू कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसतर्फे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, बऱ्याच ठिकाणी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गुरांना चारा पाण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पाणी व चारा टंचाईचे मोठे संकट उभे असून शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या हातात काही आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेती पंपाचे वीज बिल संपूर्ण माफ न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वत्र दुष्काळ असताना शासनाने खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात दिनांक १५ ते २० एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे गहू, हरभरासह केळी पिंकाचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी मागणी करूनही नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले नाहीत. जिल्ह्यात अनेक गावात पाण्याची टंचाई असून जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. अमळनेर, धरणगाव, पारोळा, चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. या ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाण्याअभावी बऱ्याच ठिकाणी बागा सुकल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची प्रशासन व राज्य शासन यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.यावर शासनाने जिल्ह्यात तात्काळ उपाययोजना लागू करून आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो ,टँकर मागणी,धरणातून आवर्तन,शेतकरी सम्पूर्ण कर्जमाफी या गोष्टी प्राधान्याने कराव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधिर तांबे, काँग्रेस प्रदेश सरचिटणिस विनायकराव देशमुख,महानगराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी आदी उपस्थित होते. निवेदनावर उदय पाटील,राजेश कोतवाल,अजबराव पाटील,एस.टी.पाटील (जामनेर),ज्ञानेश्वर कोळी, दिपक सोनवणे,  राजेंद्र महाजन, योगेश देशमुख, रवींद्र चौधरी,  महेंद्रसिंग पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Add Comment

Protected Content