मनसेचे ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांनी दिला पक्षसदस्यत्वाचा राजीनामा

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुणे मनसेचे महत्त्वपूर्ण नेते वसंत मोरे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत मनसे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर दुपारी वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते.

वसंत मोरे म्हणाले की, मी गेले २५ वर्ष सातत्याने राजकीय जीवनात काम करत आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पुण्यातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता मी होतो ज्याने राज ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत मी राज साहेबांसोबत होतो. पण, आज मी पक्षाचा आणि माझ्याकडील सर्व जबाबदाऱ्यांचा मी राजीनामा दिला आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे. पण, पक्षातील काही पदाधिकारी, जे आधी इच्छूक नव्हते त्यांची देखील नावे पुढे आली. राज साहेबांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. ज्यांच्यावर पुणे शहराची जबाबदारी होते. त्यांनी राजसाहेबांना पुण्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती जाणूनबुजून दिली. पुण्याचा नकारात्मक अहवाल देण्यात आला होता.

त्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात होता. मी राज ठाकरेंना मागच्या महिन्यात वेळ मागितली होती. पण, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. माझा वाद साहेबांसोबत नाही. पण, काही चुकीच्या लोकांच्या हाती पुणे शहर गेले आहे. माझा त्रास नेत्यांना कधीच कळाला नाही. मी काल रात्रभर झोपलो नाही. आता का मला नेत्यांचे फोन येऊ लागले आहेत? इतके दिवस त्यांना दखल घ्यावी वाटली नाही का? मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. पुणेकरांच्या म्हणण्यानुसार पुढील निर्णय घेणार आहे. त्यांनी म्हटलं तर मी एकटा निवडणूक लढवणार. लोकसभा निवडणुकीबाबत माझी शरद पवारांशी चर्चा झालेली नाही. माझ्याशी राजकीय पक्षांनी संपर्क केला आहे. पण, दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे म्हणाले.

Protected Content