पत्रकार बाळ बोठेवर अजून एक गुन्हा दाखल

नगर प्रतिनिधी । रेखा जरे खून प्रकरणात फरार असलेला पत्रकार बाळ बोठे याच्या विरूध्द एका महिलेने बदनामी करून खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. पत्रकार बाळ ज. बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

यातच बाळ बोठे याच्या विरोधात खंडणी व बदनामी केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी मंगल किसन हजारे यांनी सोमवारी रात्री फिर्याद दिली. बोठे याने ११ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ बोलावून दहा लाख रुपयांची मागणी केली तसेच माझ्या विरोधात तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करून माझी बदनामी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोठे याच्यासह एका वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बोठे याच्या विरोधात दोन दिवसापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. यानंतर आता बदनामी व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content