जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातत्याने ईडी आणि सीडीबाबत दावा करणारे आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्याकडे ती क्लिप होती, मात्र मोबाईलमधून डिलीट झाल्याचा दावा केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आमदार एकनाथराव खडसे हे सातत्याने आपल्याकडे एका नेत्याच्या अश्लील कृत्यांची सीडी असल्याचे सांगत असतात. अगदी मध्यंतरी तर त्यांनी तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लावणार अशी गर्जना देखील करून टाकली होती. अर्थात, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली तरी त्यांनी अद्याप देखील कोणत्याही प्रकारची सीडी, क्लिप वा पेन ड्राईव्ह सादर केलेला नसल्यामुळे राजकीय वर्तुळात हा विषय गमतीचा बनलेला आहे. यातच आज एबीपी-माझा या वृत्तवाहिनीवरील माझा कट्टा या कार्यक्रमात आमदार खडसे यांनी केलेला अचाट दावा हा चर्चांना निमंत्रण देणारा ठरला आहे.
आजच्या कार्यक्रमात एकनाथराव खडसे यांना सीडीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्याकडे हे व्हिज्युअल्स होते. यात भाजपचा एक नेता चाळे करत असल्याचे दिसत होते. आपण हे मुंबई आणि दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांना देखील ही क्लिप दाखविली होती. तथापि, ही क्लिप अचानक माझ्या मोबाईलमधून डिलीट झाल्याचा दावा खडसे यांनी केला. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीकडे ही क्लिप असून नंतर त्याने संबंधीत नेत्याकडे याबाबत मोठी ‘तोडपाणी’ केल्याचेही खडसे म्हणाले. याच प्रसंगी त्यांनी आपण ईडीसोबत यमक जुळवण्यासाठी सीडी शब्दाचा वापर केल्याचे देखील नमूद केले.
यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडील सीडी, क्लिप अथवा पेन ड्राईव्ह असे काहीही नसल्याचे त्यांनी स्वत:च एबीपी-माझाच्या कार्यक्रमात कबुल केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.