अमळनेर मतदार संघात आ.स्मिताताई वाघ करणार दुष्काळी दौरा

smitatai wagh

 

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील 151 तालुके, 268 महसुली मंडळे व 931 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारी यंत्रणेने दुष्काळग्रस्त शेतकरी व गावकरी यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहेच. आता भाजपा प्रदेश कार्यालयाने केलेल्या सूचनेनुसार आ.स्मिताताई वाघ या संपूर्ण अमळनेर मतदार संघात दुष्काळी दौरा करणार आहेत.

 

या संदर्भात आ.वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राज्याला दुष्काळ निवारणासाठी आतापर्यंतची सर्वाधिक मदत केली आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, रोजगार हमीच्या कामाच्या निकषात सूट, पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर्सचा वापर व शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची जोडणी खंडीत न करणे, हे आठ उपाय सरकारने दुष्काळग्रस्त भागात लागू केले आहेत. राज्यात ठिकठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. गावोगावी गरजेनुसार टॅकर्सचा वापर करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे आणि रोजगार हमीद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. आमदारांना दुष्काळग्रस्त भागात आमदार निधीतून मदत करता यावी यासाठी तरतूद करणारा शासन निर्णयही सरकारने जारी केला आहे. दुष्काळाविषयी घेतलेले निर्णय, टॅकरद्वारे पाणी पुरवठ्याबाबत घेण्यात येणारी काळजी, चारा छावण्यांची व्यवस्था, दुष्काळग्रस्त भागातील लोकांना रेशनद्वारे धान्य मिळण्याबाबत केलेली व्यवस्था इत्यादीबाबत सरकारने वेळोवेळी अनेक शासन निर्णय जारी केले आहेत. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी सरकार प्रभावीरित्या काम करत आहेच. सरकारच्या कामाला पक्ष संघटनेतर्फे साथ देण्यासाठी आणि सरकारी उपाययोजना जनतेपर्यंत प्रभावीरित्या पोहचण्यासाठी सर्व कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत.त्यादृष्टीकोणातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ डॉ संजय कुटे यानीं दुष्काळी दौरा करण्याबाबत सूचना आमदार व खासदारांना केल्या आहेत.

 

आ.स्मिता वाघ या सदर दौऱ्यातर्गत दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा देणे,सरकारने केलेल्या कामाची माहिती देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचविणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार आमदारांनी ०५ ते १० जून ह्या कालावधीत दुष्काळी तालुक्यांना भेट द्यावयाची आहे. यात चारा छावण्यांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद, सरकारी मदत योग्य रितीने पोहचत असल्याची खात्री करणे, उपाययोजना अधिक प्रभावी होण्यासाठी माहिती घेणे, टॅकर्सने पाणी पुरवठा होत आहेच तो योग्य रितीने होत आहे का?, याविषयी गावक-यांशी विशेषतः महिलांशी बातचित करणे. त्यांच्या सूचना स्वीकारणे,टॅकर्सने पुरवठा होणा-या पाण्याचे गावात योग्य रितीने वितरण होण्यासाठी टाक्यांचा पुरवठा अथवा अन्य उपायांचा विचार करणे. दुष्काळामुळे चालू असलेल्या रोजगार हमी कामांना भेट देणे, या कामात सहभागी झालेल्या गावक-यांशी संवाद, त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांना दिलासा देणे. दुष्काळाशी संबंधित कामे करणाऱ्या सरकारी अधिका-यांशी बातचीत करून दुष्काळी कामांचा आढावा घेणे. आमदार निधीतून कशा प्रकारे मदत करता येईल याची माहिती घेणे, आदीचा यात समावेश आहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल प्रदेश कार्यालयास सादर करणार असल्याचे आ.वाघ यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content