मठगव्हाण रस्त्यावर साचले डबके ; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा मठगव्हाण रोडवर मराठी शाळेच्या काही अंतरावर पावसाचे पाणी डबके साचल्याने अपघाताला निमंत्रण ठरत असून परिणामी परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत स्थानिक रहिवाश्यांनी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

पातोंडा गावातून तापी नदीच्या तीरावर वसलेल्या मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, खापरखेडा, गंगापुरी आदी गावांना जोडणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात दरवर्षी या ठिकाणी पाण्याचे भलेमोठे डबके साचते. या डबक्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने थांबवून पाण्यातून वाट काढावी लागते तर काही वाहने थेट जात असल्याने किरकोळ अपघात होत असतात. हा रस्ता अरुंद असल्याने गावांमधून वाहने काढताना जिकरीचे ठरत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटारीच शिल्लक नसल्याने पावसाचे पाणी सरळ रस्त्यावर साचत असते. मागील वर्षी काँक्रीटीकरण रस्त्यावर मुरूम ओतल्याने रस्ता खाली-वर झाल्याने डबके साचत आहे. दरवर्षी डबके साचत असल्याने वाहनधारकांना व पादचारीना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गावाच्या गटारीतून वाहून येणारे पाणी सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारीतून वाहून नाल्यात जाते. पण दोन्हीकडील गटारी ह्या जीर्ण झाल्या असून गटारीतून पाणी वाहत नाही परिणामी ते सदर रस्त्यावर साचत असते. सद्यस्थितीत पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाता येत नसून वाहनधारकांना देखील वाहने ढकलत न्यावी लागत आहे. या डबक्यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी होणाऱ्या ह्या समस्येसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील, सागर मोरे ह्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दोन्हीकडील गटारींचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याची वारंवार मागणी केली आहे. ग्राम पंचायतीने देखील तसे निवेदन देण्यात आले आहे. आमदार अनिल पाटील यांनीही सदर समस्येकडे लक्ष देऊन काम मार्गी लावावे अशी मागणी वाहनधारक व पातोंडा ग्रामस्थांमधून होत आहे.

Protected Content