शिव स्मारक स्वागत नियोजनाच्या बैठकीला खासदारांसह आजी-माजी आमदारांची दांडी !

चाळीसगाव जीवन चव्हाण | शहरात प्रदिर्घ काळानंतर शिवरायांच्या स्मारकाचे आगमन येत्या रविवार रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर याचे स्वागत करण्यासाठी आज सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र आजी-माजी आमदारांसह खासदारांनी या बैठकीला दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक उभारला जावा यासाठी विविध संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहेत. दरम्यान तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या अथक परिश्रमातून लवकरच शहरात शिवराय यांचे स्मारकाचे आगमन होणार आहे. गर्गे आर्ट गॅलरीत या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटना व सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विश्रामगृहात गुरूवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घेण्यात आली.

या बैठकीला खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण व माजी आमदार राजीव देशमुख यांनी गैरहजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. तत्पूर्वी  रविवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून तालुक्यातील पिलखोड येथून स्मारकाच्या आगमनाला सुरूवात होणार आहे. आगमनाच्या दिवशी कोणीही बॅनरबाजी करणार नाही अशी सक्ती करण्यात आली आहे. बायपास ते सिग्नल चौकापर्यंत रस्ता सजविण्यात येणार आहे. त्याचबरोबर समिती गठीत करणे, जिवंत देखावे, घरावर भगवा झेंडा लावणे, विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेणे असे विविध निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत प्रथम आगमनाचा व नंतर लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम होणार असे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी सुचित केले आहे. कोरोनाचे सावट अजून असल्याने नियमांचे पालन करून स्मारकाचे आगमन करण्यात येईल असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी बैठकीत स्मारकाच्या ऑडिट वरून चांगलेच गदारोळ पहायला मिळाले. त्यामुळे या बैठकीतूनही कुठेतरी राजकीय वास आल्याचे दिसून आले.

Protected Content