जळगाव प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन हे पश्चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले असून आज त्यांनी बालूर घाट मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या नियोजनपर बैठकीला मार्गदर्शन केले.
माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन हे पश्चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी बालघाट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या. तर आज दुपारी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक घेतली.
याप्रसंगी आ. गिरीशभाऊ महाजन म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये देखील आपल्याला शत प्रतिशत भाजपा या नुसार सत्तेत यायचे आहे. यासाठी अचूक नियोजन हे खूप महत्वाचे असते. विशेष करून शेवटच्या टप्प्यात प्रचार संपल्यानंतर याच अचूक नियोजनाच्या बळावर चांगल्या मताधिक्याने विजय मिळत असतो. भारतीय जनता पक्षाने पन्ना प्रमुख या संकल्पनेच्या आधारे अतिशय सुक्ष्म असे नियोजन केलेले आहे. कार्यकर्त्यांनी या नियोजनानुसार शेवटच्या टप्प्यात नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याचे काम करावे. अर्थात, यासाठी अंतिम टप्प्यातील नियोजन हे अतिशय महत्वाचे असल्याने सर्वांनी यानुसार काम करण्याचे आवाहन आमदार महाजन यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये आ. गिरीशभाऊ हे अन्य मतदारसंघातील सभांना संबोधीत करणार असून प्रचार फेर्यांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच त्यांचा भर हा प्रामुख्याने नियोजनांच्या बैठकांवर राहणार आहे.