लिफ्टच्या बहाण्याने ठेकेदाराला लुटले

 

 

जळगाव : प्रतिनिधी । महामार्गाच्या  ठेकेदाराला एकाने लिफ्ट मागितले. ठेकेदाराने लिफ्ट दिल्यानंतर अन्य २ दुचाकीस्वारांनी ठेकेदाराची चारचाकी थांबवित मारहाण करून  रोख रक्कम व सोन्याची चैन व अंगठी हिसकवून घेत लुटल्याची घटना शनिवारी रात्री चिंचोली गावाजवळ घडली.

 

एमआयउीसी पोलिसात लुटणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आंध्रप्रदेशातील  नेल्लूर जिल्ह्यातील वदायपाडम येथील रहिवासी सुधीर व्यंकटश्‍वर रवीपती ( ४० , ह. मू. नेरी मोहीनी हॉटेल )  हे हायवे व पुल बांधकामाचे ठेकेदार आहेत. त्यांनी औरंगाबाद हायवेवरील कुसुंबा गावाजवळील पुलाचे बांधकामांचा ठेका घेतला आहे. शनिवारी सायंकाळी मजूरांना उमाळा गावाजवळील कामाच्या ठिकाणावरुन ए  त्यांच्या एमएपी १० सीए ४११७ क्रमांकाचया वाहनात कुसुंबाला  सोडण्यासाठी गेले होते. मजूरांना सोडल्यानंतर रात्री ते नेरी येथे जाण्यासाठी निघाले होते.

 

कुसुंबा येथून ठेकेदार निघाल्यानंतर त्यांना एका इसमाने हात दाखवित उमाळा फाट्यापर्यंत लिफ्ट मागितली. दरम्यान ठेकदार सुधीर यांनी त्याला लिफ्ट दिली आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले.  चिंचोली गावाच्यापुढे त्यांच्या कारसमोर अन्य दोघांनी  मोटारसायल आडवी लावत त्याची कार थांबविली.

 

कार थांबताच दुचाकीवर आलेल्या इसमाने गाडीत लिफ्ट मागितलेल्या त्या इसमाला काय रे काय झाले असे म्हणत सुधीर ठेकेदार सुधीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुधीर यांनी मुझे क्यो मार रहे हो भाई क्या हुवा मैने क्या किया, क्या चाहिए आपको असे म्हटले असता, त्यांनी सुधीर यांना गाडीतून बाहेर काढत चल निकाल तेरे पास क्या है, असे म्हणत एकाने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकविली.

 

गळ्यातील चैन हिसकवितांना ठेकेदार सुधीर यांनी विरोध केल्यामुळे दुचाकीस्वारामधील एकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.  त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाईल व ५-५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व १ हजार २०० रुपये रोख काढून घेतले.   लुटणार्‍यांनी सुधीर यंाच्या मोबाईलचा लॉक उघडण्यास सांगून त्यांना गुगल पे व फोन पे चा पासवर्ड विचारला.  घाबरलेल्या अवस्थेत सुधीर यांनी त्यांना हे पासवर्ड देखील सांगितले.

 

ठेकेदाराला मारहाण केल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी टी शर्ट घातलेल्याने सुधीर याच्या चारचाकीचा ताबा घेतला.  चिंचोली गावापुढे असलेल्या पेट्रोलपंपापर्यंत त्यानी सुधीर यांंची गाडी  चालविली. त्यानंतर मागून दुचाकीवर आलेल्यांसोबत चारचाकी चालविणारा दुचाकीवर बसून जळगावच्या दिशेने निघून गेला.

 

लुटारुंनी सुधीर यांना चिंचोली गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ सोडून दिल्यानंतर भेदारलेल्या अवस्थेत सुधीर रवीपती हे नेरी निघून गेले. त्यानंतर त्यांनी घडलेली  संपुर्ण घटना त्यांचा मित्र व्यंकटरमणा व ईतर मित्रांना सांगितली.  आज सकाळी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन तीन अज्ञात लुटणार्‍यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे  करीत आहेत .

Protected Content