बोदवडात खडसेराज ‘खालसा’ : चंदूभाऊच किंग आणि किंगमेकरही !

बोदवड, सुरेश कोळी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्येचा विधानसभेत पराभव केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता बोदवड नगरपंचायतीच्या माध्यमातून नाथाभाऊंना जोरदार धक्का दिला आहे. विधानसभेत ‘किंग’ ठरलेले चंदूभाऊ हे नगरपंचायत निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरले आहेत. या निकालाचा धक्का हा खडसे पिता-पुत्रीसह माजी मंत्री आ. गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांना देखील बसला आहे. याचा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांवर व्यापक परिणाम होणार असल्याचेही आजच स्पष्ट झाले आहे. एकाच वेळेस खडसे कुटुंबासह भाजपला धक्का देऊन बोदवड येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेला चमत्कार हा जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात राहणार आहे. बोदवड नगरपंचायतीच्या निकालावर लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे हे विशेष विश्‍लेषण.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथराव खडसे यांना तिकिट नाकारून शेवटच्या क्षणाला त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविल्यानंतर खडसे विरूध्द पाटील असा जंगी सामना गेल्या सुमारे सव्वादोन वर्षांपासून रंगला आहे. यात गेल्या काही महिन्यांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना अनेक धक्के दिले. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर नगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांनी गळाशी लावले. तर बोदवडमध्ये नगराध्यक्षांसह भाजपच्या बहुतांश नगरसेवकांनी आमदारांची साथ घेतली. अर्थात, याचा नेमका काय परिणाम होणार ? यासाठी बोदवड नगरपंचायतीची निवडणूक ही एका अर्थाने लिटमस टेस्ट ठरली.

बोदवड येथे गेल्या अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्षाची आणि अर्थातच पर्यायाने एकनाथराव खडसे यांची सत्ता होती. बोदवडच्या ग्रामीण भागातून खडसे यांना मते मिळत नसली तरी शहरावर त्यांचे वर्चस्व कायम राहिले होते. यामुळे आधीच्या पंचवार्षिकमधील बहुतेक सहकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांनी येथील निवडणुकीसाठी उत्तम रणनिती आखली. राष्ट्रवादीची मोठी ताकद त्यांच्या सोबत होती. यामुळे या निवडणुकीत ते तगडे आव्हान उभे करून सत्ता संपादन करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

यात विशेष करून रवींद्रभैय्या पाटील यांची ताकद खडसेंसोबत असल्याने राष्ट्रवादीने प्रबळ आव्हान उभे केले होते. तर शिवसेनेने आधीचे खडसे समर्थकांसह बेरजेचे राजकारण करून अनेक असंतुष्टांना आपलेसे केले. स्थानिक राजकारणावर पकड असणार्‍या बर्‍याचशा पदाधिकार्‍यांनी आधीच आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व मान्य करून त्यांची सोबत घेतली होती. यात निवडणुकीच्या काळातील काही घटना या निर्णायक ठरल्या. विशेष करून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई यांनी रवींद्रभैय्या पाटील आणि रोहिणी खडसे यांच्या सोबत गैरवर्तन केल्याने खळबळ उडाली. यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरूध्द आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात मात्र कोणताही कटू प्रकार घडला नाही. तर आज मतमोजणीतून बोदवडकरांनी शिवसेनेला कौल दिला असून या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला पुन्हा मान्यता दिला आहे.

बोदवडमधील आजचा पराभव हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना जबर धक्का खरं तर हादरा आहे. बोदवड हे मुक्ताईनगर मतदारसंघातील महत्वाचे शहर असून येथील सत्ता हातातून गेल्याची सल त्यांना कायम सतावत राहणार आहे. तसेच हा धक्का माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना देखील बसला आहे. कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत असणार्‍या भारतीय जनता पक्षाला येथे फक्त एक जागा मिळाली आहे. आधीच भुसावळ, सावदा येथील नगरपालिकेतील खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरल्याने या दोन्ही नगरपालिका भाजपच्या हातातून गेल्या आहेत. यात आता लोकांनी निवडणुकीतही भाजपला नाकारल्याची बाब लक्षणीय आणि भाजपची चिंता वाढविणारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना देखील हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. पक्षाच्या हातातून एकामागून एक नगरपालिका निसटत असल्याची नोंद वरिष्ठ पातळीवर नक्की घेतली जाणार असून ती त्यांच्या आगामी वाटचालीवर परिणाम करणारी ठरणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवडमध्ये दिलेल्या धक्क्यानंतर आता आगामी काळात बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही खडसे विरूध्द पाटील टक्कर होणार आहे. तर सावदा नगरपालिकेत देखील खडसेंच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम आमदार चंद्रकांत पाटील करतील हे सांगण्यासाठी कुणा ज्योतीष्याची गरज नाही. बोदवडमध्ये शिवसेनेला एकतर्फी विजय मिळालेला नाही. राष्ट्रवादीने त्यांना तगडी लढत दिली. एका ठिकाणी नशिबाने दगा दिला, तर काही समीकरणे चुकली अन्यथा हा निकाल वेगळा लागला असता. मात्र लोकशाहीमध्ये एक मताने वा एका जागेने मिळविलेला विजय हा देखील विजयच असतो. विधानसभेत चंद्रकांत पाटील यांनी अल्प मतांनी विजय मिळवूनही ते आज आमदार आहेतच ना ! त्याच प्रमाणे बोदवड नगरपंचायत ही राष्ट्रवादीने कितीही टक्कर दिली तरी आता शिवसेनेच्या ताब्यात राहील ही बाब उघड आहे.

कोणत्याही एका विजयाने वा पराभवाने नेत्याचे वर्चस्व संपुष्टात येत नाही. यामुळे बोदवडचा विजय हा खडसेंसाठी फार काही जास्त हानी करणारा नसला तरी तो त्यांनी गांभिर्याने घ्यावा असाच आहे. कारण विधानसभा निवडणुकीत किंग बनलेले आमदार चंद्रकांत पाटील हे आता त्यांच्या समर्थकांसाठी किंगमेकरच्या भूमिकेतही यशस्वी ठरू लागली आहेत. बोदवडमधून यांची नांदी देखील झडली आहे. नेमकी हीच बाब खडसे विरूध्द पाटील यांच्या लढाईत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आगामी काळात रोहिणी खडसे यांचाच चंद्रकांत पाटील यांच्याशी विधानसभेत मुकाबला होण्याची शक्यता आहे. याआधी मतदारसंघातील महत्वाची सत्ता केंद्रे आपल्या हाती घेण्याची तयारी आमदार पाटील यांनी केल्याचे या विजयातून अधोरेखीत झाले आहे. आगामी काळातील या शर्यतीतील पहिला टप्पा हा चंद्रकांत पाटील यांनी जिंकला आहे. आता पुढील टप्प्यांमध्ये एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांना थोड सावध रहावे लागणार आहे. तर आ. गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांना या परिसरात भाजपचे अस्तित्व तरी रहावे यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील ही बाब उघड आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, एकाच वेळेस खडसे कुटुंबासह भाजपला धक्का देऊन बोदवड येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेला चमत्कार हा जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात राहणार आहे.

Protected Content