यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या वतीने बक्षीपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी स्वतः रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
या रक्तदान शिबिरात एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अमोल हरिभाऊ जावळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, अभ्यासू वृत्ती आणि जनहिताला प्राधान्य देणारी कार्यशैली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देत आहे. विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्याचप्रमाणे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनीही आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करताना स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आमदार जावळे यांनी सांगितले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार नंदुभाऊ महाजन, माजी आमदार अरुण पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष सुरेशभाऊ धनके, राज्य परिषद सदस्या गोमतीताई बारेला, जिल्हा सरचिटणीस केतकीताई पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, जिल्हा चिटणीस विजयभाऊ महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष राजनभाऊ लासूरकर, सुनील पाटील, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, गटनेते पी. के. महाजन, शिवसेना (शिंदे गट) तालुका संघटक राहुल पाटील, तालुकाध्यक्ष वाय. व्ही. पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, सरचिटणीस लखन महाजन, चंद्रकांत वैदकर, पवन चौधरी, निलेश सावळे, बंडू पाटील, अनंत महाजन, स्वप्नील पाटील, समाधान सावळे, विशाल नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.



