सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना हाफकीन कोण हे माहित नसल्याचे वृत्त आल्यानंतर ते चांगलेच भडकले असून त्यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ससून रूग्णालयात पाहणी करतांना हाफकीन हा कोण माणूस आहे ? अशी विचारणा केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांची सोशल मीडियातून मोठी खिल्ली उडविण्यात येत आहे. यामुळे मंत्री सावंत हे चांगलेच संतप्त झाले असून याची प्रचिती त्यांच्या सोलापूर येथील दौर्यात आली.
या दौर्यात मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, की काही जणांना शिंदे सरकार आलेलं रुचत नाही. माध्यमांनी माझं शिक्षण बघावं, सोलापूरमध्ये शिक्षण झालं, त्यावेळेस मी टॉपचा विद्यार्थी होतो. माझं शिक्षण डिग्रीपासून पीएचडीपर्यंत झालं आहे. हाफकीन या माणसाकडून औषधं घेऊ नका, असं म्हणायला मी मूर्ख आहे का? असा सवाल त्यांनी केला. एकदा माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघावं. किती संस्था, किती कारखाने त्यात किती स्टाफ आहे ते पाहावं. तुम्हाला मी अंगठा बहादूर मंत्री आहे असं वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. आपण असे वक्तव्य केले असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.