अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विप्रो उद्योगसमूहाच्या पहिल्या प्रकल्पाला (,मदर प्लांट) राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी भेट दिली.
प्रसिद्ध उद्योगपती हजीमजी प्रेमजी यांनी अमळनेर येथे विप्रो उद्योगसमूहाची स्थापना केली असून २९ डिसेंबर १९४५ रोजी स्थापन झालेल्या या उद्योगसमूहाची यशस्वी घोडदौड आजही अविरतपणे सुरू आहे. या वटवृक्षाचा विस्तार आता जगभर झालेला आहे.सदर उद्योग समूहाने अजून एखादा प्रोजेक्त अमळनेर येथे आणल्यास निश्चितच तरुणांच्या हाताला रोजगार मिळून शहराची आर्थिक सुबत्ता अधिक वाढू शकेल. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ना. अनिल भाईदास पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या अनुषंगाने ना. अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विप्रो समूहाच्या अधिकार्यांना आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद देत अजीम प्रेमजी यांची एकदा आपण भेट घेतल्यास निश्चितच काहीतरी फलित निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. त्या बैठकीनंतर नामदार पाटील यांनी नुकतीच विप्रो उद्योगसमूहाच्या पहिल्या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण पाहणी केल्यानंतर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार्या या प्रकल्पाला शासकीय, प्रशासकीयदृष्टया सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन विप्रो प्रशासनाला दिले.
नामदार पाटील हे बराच वेळ कंपनीत उपस्थित होते. त्यांनी तेथे उत्पादित होत असणार्या संतूर साबण व हॅण्डवॉश निर्मिती केंद्राची पाहणी केली. यावेळी विप्रोचा अजून एखादा नवा प्रोजेक्ट अमळनेर येथे आणू शकतो का याबाबत स्थानिक विप्रो प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली. नामदार पाटील यांनी या पद्धतीने लक्ष घातल्यास नक्कीच काही पोजेक्ट अमळनेरात येऊ शकतील आणि त्यांच्या प्रयत्नना नक्कीच यश मिळेल असे विधान अनेक कामगारांनी व्यक्त केले.