मिनल करनवाल यांचा आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे गौरव 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पदांवरील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना न्याय देत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे १३ आरोग्य सहाय्यक, एलएचव्ही व एनएम कर्मचाऱ्यांना आरोग्य विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली असून, ७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये यशस्वीरीत्या समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेला या कर्मचाऱ्यांचा पगारही मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र पवार, श्नामदार तडवी आणि आरोग्य निरीक्षक यांनी मिनल करनवाल यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांना वह्या भेट देऊन त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे आरोग्य विभागातील अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्वरित कृती करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कार्यक्षमता अधिक वाढते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सत्कार स्वीकारताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सर्व पदोन्नती मिळालेल्या व वेतन लाभ मिळवणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “गावागावात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी हे खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचे खांब आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान राखणे हीच आमची जबाबदारी आहे.” त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेतील मानवीता अधोरेखित झाली आहे.