सरन्यायाधिश भुषण गवई यांच्यावर हल्ला ; ऑल इंडिया पँथर संघटने केला तीव्र निषेध


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये झालेल्या हल्ल्याचा ऑल इंडिया पँथर संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघटनेने ही घटना फक्त एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर थेट प्रहार असल्याचे सांगितले. पँथर संघटनेने दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तातडीची मागणी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रहार

संघटनेच्या मते, सनातन धर्माच्या नावाखाली न्यायालयात द्वेष पसरविण्याचे प्रयत्न गंभीर असून हे सामाजिक सलोख्याला धोका पोहोचवत आहे. उच्च वर्णीय मानसिकतेचे विष अजूनही समाजात रूजलेले असून, एस.सी., एस.टी., बहुजन व शोषित घटकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. हा प्रकार समाजातील न्यायव्यवस्थेवर आणि समानतेच्या मुल्यावर थेट हल्ला मानला जातो.

दलित आणि वंचित घटकांवर वाढती हिंसा

पँथर संघटनेने आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा संदर्भ देत दलित व वंचित घटकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील अपमानास्पद वक्तव्ये समाजात वाढत असलेल्या जातीय वादाचे चिंतन करतात. संघटनेच्या मते, अशा प्रकारचे घातक समाजकंटक समाजात उघडपणे फिरत आहेत.

कठोर कारवाईची मागणी

संघटनेने दोषी अनिल मिश्रा, आनंद स्वरूप आणि आरक्षणाचा विरोध करणारे जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारांनी आणि देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी जर योग्य ती दखल घेतली नाही, तर भारत बंदची हाक देण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.