पुन्हा दूध महागले; उद्यापासून नवीन दर लागू

milk

पुणे प्रतिनिधी । राज्यात दुध विक्रीच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे. येत्या रविवारपासून म्हणजेच उद्या (दि.१२) जानेवारीपासून वाढीव दराने दूध विक्री होणार असल्याची घोषणा कल्याणकारी दूध संघाने केली आहे. दूधाच्या विक्री दराबाबत राज्यातील दूध कल्याणकारी संघाची बैठक नुकतीच पुण्यात झाली.

महिन्याभरापूर्वी गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयांनी वाढ करून, २९ वरून ३१ रुपये दर केला होता. मात्र, पुन्हा आता येत्या रविवारपासून (दि.१२) त्याची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर तसेच संघाचे ५२ सदस्य दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘पावडर, बटरच्या खरेदी दरात राज्यातील खासगी दूध संघांनी ३२ ते ३३ रुपये दर देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही पाऊच विक्री करणारे दूध संघ खरेदी दर ३१ रुपये दर देत आहोत. सध्या हिवाळ्यात दुधाच्या उत्पादनात दर वर्षी २० ते २२ टक्के वाढ होते. उशिरापर्यंतच्या पावसामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला. १० टक्के दूध उत्पादन घटले आहे. यामुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. परिणामी, दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याबाबत संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायी, म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर प्रत्येकी २ रुपयांनी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. सध्या राज्यात विविध दूध डेअरी गायी म्हशीच्या दूधांचा एकसारखा दर नाही. आमच्या संघाने गायीच्या दूधाचा विक्रीचा दर ४६ रुपये होता. त्यात वाढ करून ४८ रुपये केला असून, म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ झाल्याने ५६ वरून ५८ रुपये दूध होणार आहे, असेही म्हस्के यांनी सांगितले.

Protected Content