जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा गावात कचरा फेकल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा नारायण सपकाळे (वय-३५) रा. कानळदा ता.जि.जळगाव हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कचरा फेकण्याच्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारे मिलिंद रवींद्र सपकाळे यांच्यासह इतरांनी बेदम मारहाण केली. यातील एकाने कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. हे भांडण सुरू असताना कृष्ण सपकाळे याची आई कमलाबाई नारायण सपकाळे भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून मारहाण केली. या मध्ये माय लेक हे दोघे जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटने प्रकरणी कृष्णा सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता मारहाण करणारे मिलिंद रवींद्र सपकाळे, रवींद्र कडू सपकाळे, देवकाबाई रवींद्र सपकाळे, आरती रवींद्र सपकाळे, मिलींद सपकाळेचे दोन मामा, मामाचा मुलगा आणि मावस भाऊ असे एकुण ८ जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.