जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसचा वापर अवैध मालाच्या वाहतुकीसाठी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर, जळगाव पोलीस दलाने धडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विविध भागांत रात्री आणि पहाटेच्या सुमारास अचानक ‘चेकिंग’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तस्करीचे नवीन ‘नेटवर्क’ रडारवर :
गेल्या काही काळापासून रात्रीच्या शांततेचा फायदा घेत ट्रॅव्हल्स बसेसमधून गुटखा, गांजा, गावरान कट्टे, हवालाचे पैसे आणि चोरीच्या सामानाची ने-आण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, काही खाजगी बसेसचे कंडक्टर प्रवाशांच्या सेवेऐवजी अवैध मालाचे ‘कुरिअर’ म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली.

पोलीस पथकाची या ठिकाणी कारवाई :
जिल्ह्यातील महत्त्वाचे नाके जसे की, मुक्ताईनगर-बोदवड चौफुली, जळगाव शहरातील आकाशवाणी चौफुलीआणि भुसावळ परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. विशेष म्हणजे, या कारवाईत आरसीपी (RCP) पथकाचाही समावेश करण्यात आला होता. पोलिसांनी बसेस थांबवून प्रवाशांच्या सामानाची, संशयास्पद बॅगांची आणि बसच्या डिक्कीची कसून तपासणी केली.
गुन्हेगारांना इशारा
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या आणि बसेसचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे महामार्गावरील अवैध वाहतुकीला मोठा अंकुश बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारची ‘सरप्राईज चेकिंग’ सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



