



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । म्हसावद रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक क्रमांक १४४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे विभागाने याबाबत अधिकृत सूचना जारी केली असून, या कालावधीत वाहनचालक आणि प्रवाशांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाच्या सूचनेनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत म्हसावद रेल्वे फाटक क्रमांक १४४ वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम या कालावधीत करण्यात येणार असल्याने या मार्गावरील नियमित वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यासंदर्भातील सूचना रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हसावद, पोलीस स्टेशन म्हसावद, सिव्हिल हॉस्पिटल (PHC) म्हसावद, ग्रामपंचायत म्हसावद तसेच RPF/GRP जळगाव आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच परिसरातील संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती देऊन वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे फाटक बंद असताना प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. फाटक बंद असल्याची माहिती लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून ऐनवेळी होणारी गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळता येईल.
दुरुस्तीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. काम सुरू असताना रेल्वे फाटक परिसरात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याने या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पर्यायी मार्गाचा वापर करताना प्रवाशांनी अतिरिक्त वेळेचे नियोजन करावे.



