मेवासी वन विभागाला वन विभाग क्रीडा स्पर्धांचे विजेतेपद

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव वन विभागामार्फत आयोजित धुळे वनवृत्तस्तरीय क्रीडा स्पर्धा “वन चेतना २०२३-२४” चे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभाग (नंदुरबार) यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव वन विभागाचे वनउपसंरक्षक प्रविण ए यांच्या हस्ते आज संपन्न झाला.

या क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २९, ३० व ३१ डिसेंबर २०२३ रोजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन नाशिकचे मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील चारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत १०० मी, ४०० मी, ८०० मी धावणे, ४०० मी व ८०० मी जलद चालणे, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, लांब उडी, १०० × ४ रिले, क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धीबळ, कॅरम, रस्सीखेच आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत धुळे उपवनसंरक्षक , मेवासी उपवनसंरक्षक , नंदुरबार उपवनसंरक्षक , जळगाव उपवनसंरक्षक,  यावल उपवनसंरक्षकचे संघ सहभागी झाले.

या क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ आज, ३१ डिसेंबर रोजी पार पडला. स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कुलदीपसिंग किरणसिंग राजपूत (धुळे वन विभाग) व स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू प्रियंका जेकमसिंग वसावे (मेवासी वन विभाग) ठरले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक प्रविण ए यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पदक वितरण करण्यात आले.

स्पर्धेचे नियोजन उपवनसंरक्षक प्रवीण ए यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव व जळगाव उपवनसंरक्षक अधिकारी – कर्मचाऱ्यांनी केले.

 

Protected Content