आगामी काळात खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जूनपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची तजवीज मार्च-एप्रिलपासूनच केली जाते. मात्र यावर्षी रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आगामी काळात रासायनिक खतांच्या उत्पादनावर परीणाम होऊन रासायनिक खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता दिसून येत आहे.

जिल्ह्यासह राज्यातच नव्हे तर देशभरात जूनपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची तजवीज मार्च-एप्रिलपासूनच केली जाते. प्रत्येक जिल्ह्याला मागणीनुसार खरीप पेरणी हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी रशिया आणि युक्रेन मधील सुरु असलेल्या युद्धामुळे आगामी काळात रासायनिक खतांच्या उत्पादनावर परीणाम होऊन रासायनिक खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता दिसून येत आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात रशिया आणि युक्रेन मधील संघर्षाचे परिणाम दिसून येत आहेत. खाद्यतेलासह घरगुती गेंस, वाहनाचे इंधनाचे दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक दारात वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य गृहिणीचे स्वयंपाक घराचे बजेट बिघडले आहे. तर दुसरीकडे कृषीक्षेत्राला लागणारी रासायनिक खते कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी बेलारुस, रशिया या देशातून अमोनिया, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक ऑसिड, शची आयात केली जाते. परंतु परदेशात असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे बेलारुस, रशिया या देशातून होणाऱ्या रासायनिक खतांच्या कच्च्या मालाच्या आयातीवर परीणाम झाला आहे. सध्यस्थितीत राज्यासह जिल्ह्यात बाजारपेठेत कृषी केंद्रावर युरिया आणि सिंगल सुपर फोस्फेट उपलब्ध आहे. अन्य रासायानिक तसेच मिश्र खतांची टंचाई आहे. त्यामुळे आगामी काळात खरीप पेरणी हंगामात रासायनिक तसेच मिश्र खतांची कमतरता भासण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. महागाडय़ा दराने कच्चा माल घेऊन खते तयार केल्यास कंपन्यांना प्रती टन दहा ते बारा हजार नुकसानच होणार आहे. शिवाय इतकी महाग खते घेऊन पिकांना वापरणे शेतकऱ्यांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर आहे. कारखान्यांना रोखीने कच्चा माल खरेदी करावा लागत असल्याने आजघडीला कारखान्यांतील खत निर्मिती बंद आहे. त्यामुळे आगामी खरिप पेरणी हंगामात रासायनिक खतांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्याला ५ लाख में.टन रासायनिक खतांची आवश्यकता

जिल्ह्यात सुमारे ८.५० लाख हेक्टर कृषी क्षेत्रापैकी लागवडीखाली असलेल्या क्षेत्रासाठी सुमारे ५ लाख मे.टन रासायनिक खतांची आवश्यकता असते. जिल्हा कृषी विभागामार्फत एप्रिल अखेरीस खतांची मागणी नोंदवून जूनच्या सुरवातीस पुरवठा केला जातो.

Protected Content