मशाल रॅलीतून जागवल्या क्रांतिकारकांच्या आठवणी (व्हिडीओ)

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य चळवळीतील या क्रांतिवीरांच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देश्याने मंगळ सेवा संस्थेतर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे ७५ मशाली प्रज्वलित करून स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याचे अनेकविध कथाप्रसंग आपण पुस्तकांतून अनुभवतो. त्यात म्हटले आहे की, ज्योतीने ज्योत तेवत ठेवत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तत्कालीन क्रांतिवीरांनी क्रांतीची मशाल प्रज्वलित केली. अन् कायम तेवतही ठेवली. संघर्ष, बलिदान आणि संघटनेतून स्वातंत्र्य प्राप्त केले. स्वातंत्र्य चळवळीतील या क्रांतिवीरांच्या आठवणींना उजाळा द्यावा, त्यांना मानवंदना द्यावी. या कल्पनेतून मंगळ सेवा संस्थेने यंदाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे ७५ मशाली प्रज्वलित करून स्वातंत्र्यवीरांना अभूतपूर्व मानवंदना दिली.

दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मंगळग्रह मंदिराच्या परिसरातील छोट्या व्यावसायिक भगिनींना मंदिरात विधिवत मशाल पूजन व प्रज्वलनाचा मान देण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मशाली प्रज्वलित करून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत विश्र्वस्थांसह, सेवेकरी, छोटे व्यावसायिक व भाविक सहभागी झाले होते. त्यांच्या हातात मशालींसह राष्ट्रध्वजही होते. रॅली दरम्यान भारत माता की जय…! वंदे मातरम…! हम सब एक है…! हम सारे कौन है ? भारत मा के सपूत है…! साने गुरुजी अमर रहे…! अशी जोरदार घोषणाबाजी झाली.

बोरी नदी पुलावरून, न्यू लक्ष्मी टॉकीज, पाचकंदील, सुभाष चौक ते साने गुरुजींच्या पुतळ्या पर्यंत रॅली पोहोचली. तेथे संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम  व राष्ट्र सेवा दलाच्या जेष्ठ कार्यकर्त्या भारती गाला यांनी पुतळ्यास माल्यार्पण केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष  डिगंबर महाले यांनी पूजन करून माल्यार्पण केले.  सुभाष चौकात राष्ट्रसेवा दल ४० वर्षांपासून करीत असलेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात ही रॅली सहभागी झाली. तेथे राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अशोक पवार,निवृत्त मुख्याध्यापक सतीश देशमुख, भारती गाला, यांची उपस्थिती होती. राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते चेतन शाह यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण केले. 

याप्रसंगी राष्ट्रसेवा दलाचे सुधाकर देशमुख, डॉ. उदय खैरनार, धनंजय सोनार, गौतम मोरे, डॉ.मिलिंद वैद्य,  शिवाजी महाजन, अमोल येवले, कृष्णा महाजन, कल्पना मोरे, मीना शाह, शुभांगी सोनार, पंचशीला संदानशीव, देवदत्त संदानशीव, तुषार संदानशीव, आदींसह राष्ट्र सेवादलाचे अनेक कार्यकर्ते , मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी सुबोध पाटील, आशिष चौधरी, जी. एस. चौधरी, उमाकांत हिरे, व्ही. व्ही. कुलकर्णी, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, जे. व्ही. बाविस्कर, राहुल बहिरम, विशाल वाघ, खीलू ढाके आदींसह अनेक महिलाही उपस्थित होत्या.

 

 

Protected Content