मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या गटनेतेपदी नगराध्यक्षा संजना पाटील यांची बिनविरोध निवड

0
108

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहराच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या नगरपंचायत गटनेते व प्रतोद पदाच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा संजना चंद्रकांत पाटील यांची गटनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपंचायतीतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, आगामी काळात शहर विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर गटनेतेपद कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी, २९ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकमताने संजना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

या निवडीमुळे नगरपंचायतीतील सत्ताधारी गट अधिक बळकट झाला असून, नगराध्यक्षा व गटनेत्या अशी दुहेरी जबाबदारी संजना पाटील यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांना दिशा मिळेल, तसेच प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी होईल, असा विश्वास सत्ताधारी गटातील सदस्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

निवड प्रक्रियेवेळी शिवसेनेचे विजयी उमेदवार तसेच सहयोगी अपक्ष नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेतर्फे प्रशांत अशोक टोंगे, खान नसिबाबी शाहबाज, भालेराव प्रीती प्रमोद (वानखेड प्रीती राजरत्न), सोनवणे अंजनाबाई सुपडू, शेख ताहेराबी लुकमान, शेख मस्तान शेख इमाम, कोळी संतोष प्रल्हाद, भारंबे प्रमोद हरी, भलभले सविता सुभाष आणि शिरसाट देवयानी निलेश हे सदस्य उपस्थित होते. तसेच सहयोगी अपक्ष उमेदवार नुसरत बी. मेहबूब खान, हासम शहा कासम शहा आणि सलीमाबी मुशीर मण्यार यांनीही या निवडीसाठी आपला पाठिंबा दर्शवला.

गटनेतेपदी निवड जाहीर होताच मुक्ताईनगर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, तर नागरिकांकडून संजना पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नगराध्यक्षा आणि गटनेत्या अशा दुहेरी भूमिकेतून त्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा नवा रोडमॅप आखतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

एकूणच मुक्ताईनगर नगरपंचायतीतील या बिनविरोध निवडीमुळे राजकीय स्थैर्य प्राप्त झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना वेग मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.