अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेसमोर असलेल्या दुकानांना आज अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही दुकाने बंद असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी टळली असून, अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर नगरपरिषदेसमोर असलेल्या दुकानांना अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकाने बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शटर तोडावे लागले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थोडा वेळ लागला. या आगीत दुकानांमधील कटलरीचे साहित्य, पाण्याचे जार, फरसाण आणि इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, शॉर्ट सर्किट हेच आगीचे प्राथमिक कारण असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.