मशिदीवर भोंगे लागतील तर समोर हनुमान चालीसा लागेल : राज ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण धर्मप्रेमी असलो तरी धर्मांध नाही असे नमूद करत आज राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. यात त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात आले नाहीत तर याच्या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचे दिसून येत होते. या अनुषंगाने आजच्या मेळाव्यातील भाषणात त्यांनी हीच भूमिका अधिक प्रखरतेने आणि आक्रमकपणे मांडली. तर राज्यातील सत्ताधारी आघाडीवर तुटून पडतांना त्यांनी शिवसेनेलाच प्रामुख्याने टार्गेट केले.

राज ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेला सत्ताधारी शिवसेनेने अक्षरश: ओरबडून घेतले आहे. यांच्या डोळ्यासमोर मुंबईत अनेक ठिकाणी बेहरामपाडे उभे राहिलेत. मात्र यांनी काहीही केले नाही. यांनी फक्त पैसे कमावण्याचे काम केले. मुंबईला बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुख्यमंत्रीपदाचा मोह धरल्यामुळे उध्दव ठाकरे यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असेही सांगितले.

या भाषणात राज ठाकरे यांनी आपण अयोध्या येथे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे जाहीर करतांना आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील पक्षातर्फे उत्साहाने साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर बेहरामपाड्यातील मदरशांवर धाडी टाकल्यास यातून भयंकर बाबी समोर येतील असा दावादेखील केला. अलीकडच्या काळात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चर्चेत असतांना राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याची मागणी केली. जेथील भोंगे काढले जाणार नाहीत त्या मशिदींच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार असल्याचा इशारा सुध्दा त्यांनी दिला.

Protected Content