मुंबई । सकल मराठा क्रांती मोर्चाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मशाल मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चांच्या नियमावलीप्रमाणेच ७ नोव्हेंबरला सायंकाळी मशाल मार्चही शांततेत काढला जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजन घाग यांनी सांगितले की, मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर या सरकारने स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी तात्काळ अर्ज करणे व त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते. मराठा विद्यार्थ्यांचे व तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय तातडीने घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता सरकारचा एमपीएससी परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय यासारख्या काही निर्णयांनी मराठा समाजाच्या असंतोषात भरच पडली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून होणारे वक्तव्य आणि निर्णयातील गोंधळ वारंवार समोर येत आहे. यामुळे सरकारने एकूण निर्णय प्रक्रियेवर आलेली मरगळ दूर करण्यासाठी ही वैचारिकतेची मशाल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानावर धडक मशाल मार्च काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती घाग यांनी दिली.
दरम्यान मशाल मार्चचा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार असून या मार्चमध्ये मुंबईतील मराठा आमदार आणि खासदारांनीही सामील व्हावे, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.