
फैजपूर : निलेश पाटील माजी गृहराज्यमंत्री जे.टी.महाजन यांचे चिरंजीव तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन भाजपच्या वाटेवर असल्याचे खळबळजनक वृत्त ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या हाती आले आहे. विशेष म्हणजे भाजप प्रवेशालाच्या वृत्ताला महाजन यांनी दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे आ. हरिभाऊ जावळेही महाजन यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही असून माजी आमदार शिरीष चौधरी यांना हा एक प्रकारे जबर धक्का असल्याचे मानले जात आहे.
यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाने लावलेले रोपटे वटवृक्ष झाले असले तरी त्या वटवृक्षाच्या फांद्या आता गळायला सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून भाजपचे ताकद वाढली आहे. आता तर शरद महाजन भाजपात जाणार असल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्था पसरली आहे.
मसाका चेअरमन शरद महाजन यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता. महाजन यांनी सांगितले की, भाजपात प्रवेश करणार ही चर्चा सुरू आहे. पण मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. आपल्या भागातील जे वैभव आहे. ते मधुकर सहकारी साखर कारखाना हा टिकला पाहिजे, हाच माझा हेतू आहे. कार्यकर्ते सांगतील तो मी निर्णय घेईल. लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कळवले जाईल, अशी प्रतिक्रिया शरद महाजन यांनी दिली आहे.
मुबंईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रवेश
एका जवळच्या कार्यकत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा प्रवेश येत्या तीन ते चार दिवसात होणार आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे. यात मसाकातील काँग्रेसचे काही संचालक देखील प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता मधुकर सहकारी साखर कारखान्यावर जे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. ते पुन्हा भाजप मय होण्याची शक्यता आहे. तर यावल तालुक्यातील काही काँग्रेसचे दिग्गजही भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळते.