अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ॲग्री स्टॅक जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला.
मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. अमळनेर तालुक्यातील १५६ गावांमध्ये हा जनजागृती रथ फिरणार असून, शेतकऱ्यांना या योजनेची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
ॲग्री स्टॅक योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, राज्यस्तरावर तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना अधिक सुलभ पद्धतीने मिळावा, तसेच नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची केवायसी नोंदणी एकदाच केली जाणार असून, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनांसाठी स्वतंत्र केवायसी करावी लागणार नाही. तसेच, पीक कर्ज, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे.
या कार्यक्रमास तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी पी. एल. मेखा, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञान रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.