चि. विक्रम यांच्या अद्वितीय विवाह सोहळ्याला मान्यवरांसह सर्वसामान्यांचा आशीर्वाद (Video)

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी | रावापासून ते रंकापर्यंतच्या आबालवृध्दांनी विक्रमी संख्येने हजेरी लावल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान पुत्र चिरंजीव विक्रम यांचा विवाह हा लक्षवेधी ठरला. यात राज्यातील मातब्बर मंत्र्यांपासून ते मतदारसंघातील गोरगरीब जनतेने उपस्थित राहून आपल्या भाऊंच्या पुत्राला भरभरून आशीर्वाद दिले. तर याच विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गुलाबभाऊंनी आपली जमीनीशी जुळलेली घट्ट नाळ ही अद्यापही कायम असल्याचे दाखवून दिले. अगदी सर्वसामान्य परिस्थिती असणार्‍या कुटुंबात जन्मलेला गुलाभबाऊंनी अनेकदा जनतेचे प्रेम हीच आपली श्रीमंती असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या पुत्राच्या विवाहात जनतेच्या याच प्रेमरूपी श्रीमंतीचे दर्शन जगाला घडले असून हा विवाह सोहळा ‘न भूतो….न भविष्यती’ या प्रकारातील ठरला आहे. अतिशय नियोजनबध्द पध्दतीत पार पडलेल्या या सोहळ्याला हजारोंच्या जनसमुदायाने उपस्थित राहून नवपरिणीत जोडप्याला आशीर्वाद दिलेत. तर जनतेच्या या प्रेमामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील अक्षरश: भारावल्याचे दिसून आले.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम आणि सनफुले (ता. चोपडा) येथील भगवान भिका पाटील यांची कन्या चिसौकां प्रेरणा यांचा विवाह सोमवार दिनांक २९ रोजी अतिशय चैतन्यदायी वातावरणात पार पडला. आदल्या दिवशी राहत्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे आणि सिध्दीविनायक देवस्थानाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी वर-वधूंना आशीर्वाद दिले. तर विवाहाचा मुख्य कार्यक्रम पाळधी येथील श्री साई मंदिरानजीक असणार्‍या भव्य प्रांगणात पार पडला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी साधा टपरीचालक नंतर शिवसैनिक ते राज्यातील महत्वाच्या खात्याच्या मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा अतिशय संघर्षातून पार केला आहे. आज कारकिर्दीत यशोशिखरावर असतांनाही त्यांचे पाय जमीनीवर आहेत. ते जमीनीशी घट्ट जुळून आहेत. खरं तर बहुतेक राजकारणी हे आपल्या मुला-मुलींचा विवाह हा तेवढ्याच तोलामोलाच्या राजकीय वा औद्योगीक/व्यावसायिक क्षेत्रातील मातब्बर घराण्यात करत असतात. ना. गुलाबराव पाटील हे मात्र याला अपवाद ठरले. त्यांनी आपले ज्येष्ठ पुत्र प्रतापराव आणि कन्या प्रियंका यांचा विवाह हा सर्वसाधारण कुटुंबात केला. याच प्रमाणे लहान पुत्र विक्रम यांचा विवाह देखील हा सर्वसामान्य कुटुंबातील तरूणीशी ठरविला. हे राजकारणातील दुर्मीळ आणि कदाचित एकमेव उदाहरण असावे.

काल सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी वैदीक पध्दतीत विवाह पार पडला. यानंतर दुपारपासूनच मान्यवरांपासून ते सर्वसामान्य जनतेची पावले साई मंदिराजवळच्या विवाह स्थळाकडे वळली. या अतिशय भव्य मात्र तितक्याच नेटक्या आणि नियोजनबध्द सोहळ्यात राज्य सरकारच्या नियमांचे पालन करण्यात आले. विवाह स्थळाच्या जवळच कोरोना लसीकरण शिबिर दिवसभर घेण्यात आले. यात….इतक्या स्त्री-पुरूषांना कोरोनाची लस देण्यात आली. दरम्यान, भव्य मंडपाच्या बाहेरून आत प्रवेश करतांना प्रत्येकाला मास्क देण्यासह सॅनिटाईज करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक व्यक्तीचे पाटील परिवारातर्फे अगत्याने स्वागत करण्यात आले. पारंपरीक वाद्य आणि प्रथांना आधुनिक साज लेऊन हा सोहळा पार पडला. याच्या मागील बाजूस अतिशय भव्य अशा भोजन कक्षाची उभारणी करण्यात आली होती. यात एकाच वेळेस तब्बल पाच हजार स्त्री-पुरूषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे गुलाबभाऊंनी या सोहळ्यासाठी भारतीय बैठकीच्या स्वरूपातील भोजन व्यवस्था केली होती. येथील सुग्रास आणि अत्यंत चविष्ट अशा भोजनावळीला परिसरातील हजारो आबालवृध्दांनी हजेरी लावली. यात मतदारसंघातील सर्व स्तरांमधील आणि सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरूषांचा समावेश होता. प्रत्येकाने जणू काही आपल्याच घरचे मंगल कार्य असल्यासारखी भावना येथे व्यक्त केली.

सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वर चि. विक्रम आणि वधू चिसौकां प्रेरणा यांचे मंडपात स्वागत झाले. सरकणार्‍या स्लाईडवर उभारण्यात आलेल्या भव्य रथातून नेत्रदीपक रोषणाईच्या वर्षावात वर-वधू व्यासपीठावर विराजमान झाले तो क्षण हजारो जणांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सदस्यांनी स्वागत केले. आपल्या घरातील मंगल कार्यात ना. पाटील यांनी आपल्या भाऊबंदकीचा यातून यथोचित सन्मान केल्याची बाब उपस्थितांना भावली. दरम्यान, मान्यवरांपैकी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. बाळासाहेब थोरात, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलीक आणि माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आ. गिरीश महाजन यांनी वर-वधूंना आशीर्वचनपर मनोगत व्यक्त केले. यानंतर मंगलाष्टके होऊन साधारणपणे आठ वाजेच्या सुमारास वर-वधूंनी एकमेकांना हार घालून जन्मभराची साथ निभावण्याची शपथ घेतले तेव्हा परिसर मंगलवाद्यांसह नेत्रदीपक आतषबाजीने दणाणून निघाला. हे सर्व क्षण उपस्थितांना याची देही याचि डोळा अनुभवण्याची संधी मिळाली.

या सोहळ्याचे अतिशय अचूक असे नियोजन करण्यात आले. यात पार्कींगची व्यवस्था, व्हीआयपी पार्कींग, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे स्वागत व सत्कार तसेच मान्यवरांसह सर्वसामान्यांना सुरळीतपणे बाहेर पडण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी जिल्हा प्रशासन व विशेष करून पोलीस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. नियोजनाची संपूर्ण सूत्रे ही जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी चोखपणे पार पाडली. या अभूतपुर्व सोहळ्याचे अतिशय खुमासदार असे सूत्रसंचालन पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. तर या कार्यक्रमाची गोडी वाद्यवृंदाने वाढविली. याला उपस्थितांची अतिशय जोरदार दाद मिळाली.

याप्रसंगी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलीक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहमंत्री दीपक केसरकर, युवासेनेचे सचिव वरूण देसाई आदी मंत्र्यांची उपस्थिती लाभली. यासोबत आमदार गिरीश महाजन, राजूमामा भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, किशोरआप्पा पाटील, अनिल भाईदास पाटील, शिरीषदादा चौधरी, लताताई सोनवणे, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, चिमणराव पाटील, अनिल कदम, बालाजी किणीकर, काशिनाथ पावरा, अमरीशभाई पटेल, मंजुळा गावित, शहाजीबापू शिंदे, संजय राठोड, आमदार देशमुख, उदयसिंग राजपूत, भरतशेठ गोगावले, प्रकाश सुर्वे, सुनील शिंदे, महेंद्र थोरवे, भास्कर जाधव, मीना कांबळी, सुनील प्रभू, युवासेनेचे राहूल कलाल, कुणाल दराडे, योगेश निमसे, अभिषेक चित्रे, नितीन देशमुख, संजय गायकवाड आदी आमदारही या सोहळ्याला उपस्थित होते.

यासोबत महापौर जयश्रीताई महाजन, जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी मंत्री सचिन अहिर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी गुलाबराव देवकर, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, युवासेनेच्या रंजना नवलकर, पंढरपूर देवस्थानचे संचालक तथा सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे व गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानगराध्यक्ष शरद तायडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रांमधील मान्यवरांची मांदियाळी या सोहळ्याला उपस्थित होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/648383239868440

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1328413530946953

Protected Content