मराठी लोकभाषा ही ज्ञानभाषा बनेल – प्रा. तानसेन जगतापांचा विश्वास

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आपली मराठी भाषा संस्कृतपेक्षा सोपी आहे. मराठी भाषेचा दर्जा मुळात अभिजात आहे. मात्र मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारशी आमचा लढा सुरू आहे. दरम्यान, अभिजात मराठी लोकभाषा ही ज्ञानभाषा बनेल, असा विश्वास अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चोपडा यांच्या चौथ्या वर्धापन दिन व सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

साहित्याबाबत परिवर्तन निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी दिल्लीत आंदोलने देखील झालीत पण अद्याप त्याची फलश्रुती मिळाली नाही. मध्यंतरी गुजराती भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी असल्यामुळे मराठीला थोपविले जात असल्याची चर्चा कानावर आली. श्रेयाच्या राजकारणात आम्हां मराठी भाषिकांना रस नाही कोणीही श्रेय घ्या पण अभिजात दर्जा द्या.या विशेष दर्ज्यामुळे मराठी भाषा विकासासाठी सहाशे कोटी रुपये मिळतील, विविध विद्यापीठात मराठीला विशेष सन्मान प्राप्त होईल.त्याचा उपयोग मायमराठीचा जोगवा करण्यासाठी होईल. असे ही प्रा. तानसेन जगताप म्हणाले.

यावेळी त्यांनी सध्या राजकारणाची दुरावस्था पाहून टी.व्ही.पाहू वाटत नाही तर वृत्तपत्र वाचू वाटत नाही.त्यामुळे साहित्यिक,सांस्कृतिक व्यक्तिंची गरज आज आहे.चोपड्याच्या म.सा.प.शाखेचे कामकाज अतिउत्तम असून चाळीसगाव नंतर आपली शाखा जिल्ह्यात आदर्श शाखा ठरेल.आपला कार्य अहवाल उत्तमच आहे.ज्ञान व विचार देणारी मराठीच्या सेवेसाठी काम करणारी माणसं या ठिकाणी असल्याचे प्राचार्य जगताप म्हणाले.

प्रारंभी कविवर्य वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.म.सा.प.चे जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी केले. प्रास्तविक,अहवाल वाचन आणि सुत्रसंचालन संजय बारी यांनी केले.तर आर्थिक पत्रकांचे वाचन योगेश चौधरी यांनी केले.सर्व विषय एकमताने मंजूर करीत सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी मसापच्या चोपडा शाखेचे शंभरावे सदस्य म्हणून डॅा.मनोज साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच उत्कृष्ट अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे गौरविण्यात आलेले व्ही.एस.पाटील, भगवान (छोटू) वारडे,विलास पी.पाटील,पंकज नागपुरे,पंकज बोरोले,संजय बारी यांचा विशेष कार्यकर्तृत्वाबद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी केले.

पंकज विद्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या मंचावर म.सा.प.शाखाध्यक्ष कविवर्य अशोक सोनवणे,विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनःश्याम अग्रवाल,शाखेचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन,कार्याध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह संजय बारी, कोषाध्यक्ष योगेश चौधरी,विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष डॅा.विकास हरताळकर, कार्यवाह श्रीकांत नेवे,पंकज बोरोले उपस्थित होते.

 

 

Protected Content