पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा महाविद्यालयात ‘मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा’ संपन्न झाली. याप्रसंगी ‘मराठी आणि विश्वकोश यांचा जैविक संबंध असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.राजा दीक्षित यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा, जि. जळगाव येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक खलील देशमुख उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी यांच्या हस्ते झाले. ते यावेळी बोलताना म्हणाले की, मराठी विश्वकोश नोंद लेखनामध्ये सातत्याने बदल होत आला असून आज मराठी विश्वकोश खंड २१ हा नव्या रूपात आला आहे. मराठी विश्वकोशाचे अनेक विद्याशाखांशी संबंध येत असतो.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भीमराव नारायण पाटील यांच्या सेवापूर्तीपर ‘खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी ‘खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या’ या ग्रंथाचे प्रकाशन केले. या संशोधन ग्रंथाचे संपादन प्रा. डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. डॉ. वासुदेव वले, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. दीपक शिरसाट यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. राजा दीक्षित म्हणाले की, “मराठी आणि विश्वकोश यांचा जैविक संबंध आहे. मराठी विश्वकोशातून खऱ्या अर्थाने ज्ञानप्रसाराचे काम भाषा करते. विश्वकोशामुळे अद्यावत ज्ञानप्रसार, संस्थात्मक ज्ञानप्रसार आणि सैद्धांतिक मांडणीची नोंद करता येते. मराठी विश्वकोश एक प्रकारे ज्ञानाची बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी अशा दोन्ही बाजू जपण्याचे काम करतो.
त्यापूर्वी राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला सन – १९७६ पासून सुरुवात झाली आणि आज काळानुसार यामध्ये विकास होत होत संशोधनाच्या दृष्टिकोनाने मराठी विश्वकोशाचा २१ वा खंड आपणासमोर आहे. आज मराठी विश्वकोशामध्ये १८ हजार २४४ पेक्षा जास्त नोंदी आपणास पहावयास मिळतात. विश्वकोशाला अजून संशोधनात्मक दृष्ट्या परिपूर्ण करायचे असेल तर आपल्यासारख्या प्राध्यापकांनी एक लेखक म्हणून आपला वेळ मराठी विश्वकोश निर्मितीला द्यावा.” असे आवाहन केले.
पहिल्या सत्रात डॉ.जगतानंद भटकर यांनी, “मराठी विश्वकोश हा विश्वसनीय ज्ञानाचे माध्यम आहे. त्यासाठी आपल्यासारख्या लेखकांनी ज्ञानसंपन्न होण्याची गरज आहे. मराठी विश्वकोशामधील नवनिर्मिती म्हणजेच मराठी ज्ञानभाषेची निर्मिती होय. मराठी विश्वकोशाला नोंद कमी मिळण्याचे कारण म्हणजे आजच्या समाजात ऐतिहासिक साक्षरतेची कमतरता होय. मराठी विश्वकोशामध्ये नोंद करण्यासाठी गुणवत्ता आणि शिस्त असावी लागते.” असे प्रतिपादन केले.
यावेळी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकामधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. वासुदेव वले यांनी स्पष्ट केली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश देवरे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड व विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक उपस्थित होते. या मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेसाठी १७५ प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जतिनकुमार मेढे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अतुल देशमुख यांनी केले. डॉ. अक्षय घोरपडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.