मराठा क्रांती मोर्चा प्रतिनिधींनी घेतली आमदार चव्हाण यांची भेट

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी आमदार मंगेश चव्हाण यांची शनिवारी भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मराठा आरक्षणाला मिळालेल्या अनपेक्षित स्थगितीमुळे समाजात तीव्र स्वरूपाचा असंतोष असल्याचे सांगत त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून काही बाबींकडे लक्ष वेधले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिनिधींना सांगितले की, महाराष्ट्रात मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, मी स्वतः सर्वसामान्य मराठा कुटुंबातून आलेला आमदार आहे. मला समाजाच्या वेदना कळतात. भारतीय जनता पक्षाने राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकवून दाखवले. नंतर सरकार जरी बदलले तरी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू असताना विरोधी पक्षासह अनेक संघटनांनी सरकारने यात गांभीर्याने लक्ष द्यावे अशी वेळोवेळी विनंती केली होती. मात्र त्याकडे सरकारने अनेकदा दुर्लक्ष केले आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर अनपेक्षित अशी स्थगिती आली.

हे कमी की काय आरक्षणावर स्थगिती येऊन २ दिवस होत नाहीत तोच सरकारने १२ हजार पोलीस शिपाई भरती काढून बेरोजगार मराठा तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले. हा निर्णय होताच मी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करून विरोध नोंदवला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेणार हे निश्चित नसताना, मराठा आरक्षणावर सुयोग्य व सर्वमान्य असा तोडगा निघेपर्यंत तरी किमान अश्या प्रकारच्या नोकर भरती सरकारने काढू नये अशी आमची भूमिका आहे. मी तन-मन-धनाने समाजासोबत असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना पत्र देऊन समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.

मोठा भाऊ असणाऱ्या मराठा समाजाच्या सोबत राज्यातील अठरा पगड जाती, बारा बलुतेदार बांधव देखील लहान भावाची जबाबदारी पार पाडत आपल्या लढ्याला साथ देतील असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी रयत सेनेचे गणेश पवार , संभाजी सेनेचे लक्ष्मणबापू शिरसाठ, खुशाल पाटील, प्रदीप मराठे ,छोटू पाटील ,विशाल देशमुख, दिवाकर महाले, भाऊसाहेब सोमवंशी, अविनाश काकडे, राहुल म्हस्के ,सतीश पवार, संजय कापसे, अरुण पाटील ,पंकज रणदिवे आदींची उपस्थिती होती.

Protected Content