Home Cities अमळनेर अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी चेतन राजपुत यांची नियुक्ती

अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी चेतन राजपुत यांची नियुक्ती


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन देवसिंग राजपुत यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार पार पडली. जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मान्यतेने ही घोषणा करण्यात आली. अमळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतन राजपुत यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

गेल्या दहा वर्षांपासून अमळनेर शहराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे मुक्तार खाटीक यांनी काही कारणास्तव राजीखुषीने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर पक्षश्रेष्ठींनी आता तरुण चेहरा म्हणून चेतन राजपुत यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. राजपुत हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक आणि राजकीय वर्तुळात अत्यंत सक्रिय आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना शहराची नस चांगली ठाऊक आहे.

चेतन राजपुत केवळ राजकारणातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. ते ‘न्यू प्लॉट परिसर विकास मंच’चे अध्यक्ष आहेत, तर ‘राजपूत एकता मंच’चे संचालक म्हणूनही ते आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. त्यांच्याकडे असलेली उत्तम संघटन कौशल्ये आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता पाहता, त्यांच्यावर अमळनेर शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, त्यांच्या कार्यकाळात पक्ष अधिक बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound