ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही-छगन भुजबळ

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  ओबीसी नेत्यांची एल्गार सभा आज पंढरपुरात आयोजित करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी या सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “समोरच्या लोकांच्या मागण्या खूप आहेत. ती गरीब लेकरं आहेत. त्यांची लेकरं-बाळं गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. फुलं उधळण्यासाठी 200 जेसीबी आहेत, ते गरीब आहेत. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय, ते गरीब आहेत. हे करत असताना, खरोखरच मराठा समाजाचे जे गरीब कार्यकर्ते आहेत, सभेला आले अपघातात गेले. माझ्या मतदारसंघातीलही काही जण तिथे गेले. जेसीबीच्या अपघातात एक जण स्वर्गवासी झाले. अरे त्यांना श्रद्धांजली तर करा. जे मृत्यूमुखी पडले त्यांचं काय? त्यांची त्यांना आठवण नाही”, असा दावा छगन भुजबळांनी केला.

“मुंबईला जाणार, मुंबईला जाणार. त्यांचे गरीब लेकरं-बाळं 200 गाड्या घेऊन मुंबईला गेले. का? तर मैदान बघायला कुठे उपोषण करायचं आहे. हे सगळे गरीब आहेत आणि माझ्यासमोर बसेलेले भटके-विमुक्त, माळी, कोळी हे काय श्रीमंत आहेत? मुळात आरक्षण हे गरीबीवर नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“तुम्हाला आरक्षण पाहिजे ना? आमचा त्याला पाठिंबा आहे. पण ते आरक्षण स्वतंत्र घ्या. 10, 12, 15 टक्के ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं आहे की, ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसीमधून संपूर्ण मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही”, असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं.

“लोक घाबरले असतील, पुन्हा सांगतो, माझ्याविरुद्ध प्रकार करणारे लोक त्यांना सांगायचं आहे. मी मराठा समाजाला आरक्षणासाठी नेहमी पाठिंबा दिला आहे. त्यांना आरक्षण वेगळं द्या. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“आमची अनेक ठिकाणी लायकी काढली जाते. शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता, शिवाजी महाराजांसाठी लढणारी सेनेला मराठा सेना कधी म्हटलं गेलं नाही तर मावळ्यांची सेना म्हटलं गेलं”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Protected Content