इस्रोची ऐतिहासिक कामगिरी; एल-1′ लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला ‘आदित्य’

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर (Lagrange Point) प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे

आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल.

आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.

लॅग्रेंज पॉइंट या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.

एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

Protected Content