मुंबई-वृत्तसेवा । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
२४ जुलै १९३७ रोजी जन्मलेल्या मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ‘शहीद’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘दस नंबरी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जात होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने, तर २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विभाजनानंतर मनोज कुमारचे कुटुंब दिल्लीमध्ये आले होते. ते फक्त १० वर्षांचे असतानाच विभाजनामुळे स्थलांतरित झाले. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी हिंदू कॉलेजमधून आर्टमध्ये ग्रॅज्युएशन केले होते. लहानपणी त्यांना दिलीप कुमार, अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांच्या अभिनयाची आवड होती. शबनममध्ये दिलीप कुमारच्या पात्रावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले नाव मनोज कुमार ठेवण्याचा निर्णय घेतला. काही काळासाठी त्यांनी एक फैशन ब्रँडमध्येही काम केले, ज्यामुळे नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला.
मनोज कुमार यांनी सुरुवातीच्या काळात ‘सहारा’ (१९५८), ‘चांद’ (१९५९) आणि ‘हनीमून’ (१९६०) सारख्या चित्रपटांत काम केले. त्यांना ‘कांच की गुड़िया’ (१९६१) मध्ये पहिल्यांदाच लीड रोल मिळाला. त्यानंतर ‘पिया मिलन की आस’ (१९६१), ‘सुहाग सिंदूर’ (१९६१) आणि ‘रेशमी रूमाल’ (१९६१) अशा चित्रपटांनी त्यांचा ठसा उमटवला, जरी काही चित्रपटांनी अपेक्षित यश मिळवले नाही. विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ (१९६२) या चित्रपटाने त्यांना मोठे यश मिळाले. नंतर ‘शादी’ (१९६२), ‘डॉ. विद्या’ (१९६२) आणि ‘गृहस्थी’ (१९६३) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. यानंतर अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनातही पदार्पण करून ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘क्रांति’ आणि ‘क्लर्क’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.