मनोज जरांगेंचे आमरण उपोषण स्थगित

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला दिलेला वेळ १३ ऑगस्ट रोजी संपत आहे. तोपर्यंत सरकारला वेळ देत आहे. तोपर्यंत त्यांनी आरक्षण द्यावे. मी आता उपोषण करण्यावर ठाम नाही. कारण, समाजाचा हट्ट आहे, की मी उपोषण मागे घ्यावे. आरक्षण हवे आहे तसे तुम्ही देखील हवे आहात असे समाजाचे म्हणणे आहे, असे जरांगे म्हणाले.

कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने यावे. त्यांनी मराठ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असले बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नसते. हा फक्त वेळकाढूपणा झाला. सलाईन लावून पडण्यात काही उपयोग नाही. समाजाचा प्रचंड दबाव आहे. वेळ लागला तरी चालेल पण तुम्ही देखील आम्हाला हवे असल्याचे समाज म्हणत आहे. त्यामुळे उपोषण थांबवत आहे, असे जरांगे म्हणाले.

समाजाचा हट्ट माझ्यासमोर भयानक आहे. तुम्ही असाल तरच समाजाची एकजूट राहील अशी समाजाची भावना आहे. रात्री विनंती केल्याने मी सलाईन लावले. मी कितीही विरोध केला तरी त्यांनी मला सलाईन घेण्यास लावले. पण, अशा पद्धतीने उपोषण काही कामाचे नाही. आता एक-दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरू करेन. सलाईन लावून उपोषण करण्यास मी तयार नाही, असे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.

मी इथे झोपून कशाला वेळ घालवू. त्यापेक्षा मला राज्यात फिरता येईल. सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. असे झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातिवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो, असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत. मला सलाईनशिवाय उपोषण करू द्यावं तेव्हा मी यांना दाखवतो. पण, समाज यासाठी तयार नाही. १३ ऑगस्टपर्यंत सरकारने आरक्षण द्यावे. नाहीतर मी त्यांना काय दाखवायचं ते दाखवतो, असेही जरांगे म्हणाले.

Protected Content