जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील 5 दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
मनोज जरांगे पाटलांची तब्येत चिंतजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना – जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.