जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण आणि आंदोलनही केले. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागणीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच आता राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी आज २० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबतचा कौल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ‘ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. मग त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करायचा नाही. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं’, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.