मनोहर पर्रीकरांची प्रकृती बिघडली

पणजी वृत्तसंस्था । गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तेथील राजकीय संकट अजून गडद झाले असून राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती चिंताजनक बनली असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसने गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, काँग्रेसचा पवित्रा पाहून सरकार वाचवण्यासह नवीन मुख्यमंत्रीपदाचा शोध भाजपने सुरू केला आहे. काल रात्री गोवा भाजपाची बैठक पार पडली. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना गोव्यातच राहण्याची सूचना केलेली आहे. तर मुख्यमंत्री पदासाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपा अध्यक्ष आणि केंद्रातील नेते आज रविवारी आमदारांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी शनिवारी पाच आमदारांसह पर्रीकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यात त्यांच्या पक्षाचे जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासह रोहन खावटे, गोविंद गावडे आणि प्रसद गावकर या तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ढासळली असली, तरी स्थिर आहे. आम्ही त्यांच्यासोबतच असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Add Comment

Protected Content