Home Cities अमळनेर मंगरूळ-शिरुड रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; अर्धवट दुरुस्तीवर संताप, तातडीच्या कामाची मागणी

मंगरूळ-शिरुड रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; अर्धवट दुरुस्तीवर संताप, तातडीच्या कामाची मागणी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ-शिरुड मार्गाची दुरवस्था आता नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरत असून अर्धवट दुरुस्तीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवघ्या चार किलोमीटरच्या या महत्त्वाच्या मार्गापैकी केवळ दोन किलोमीटरपर्यंतच डागडुजी करून उर्वरित रस्ता खड्डेमय अवस्थेत सोडण्यात आल्याने हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मंगरूळपासून पुढे शिरुड व कावपिंप्रीसह अनेक गावांना जोडणारा हा रस्ता रोजच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर या मार्गावर वर्दळ असते. मात्र दोन किलोमीटरनंतर रस्त्याची अवस्था अत्यंत भीषण झाली असून मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि असमतोल पृष्ठभागामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः समोरून अवजड वाहने आली की दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला उतरावे लागते. साईडपट्ट्या घसरलेल्या असल्याने वाहन घसरण्याची शक्यता वाढली आहे. उडणाऱ्या धुळीमुळे दृश्यमानता कमी होत असून संतुलन बिघडून अपघात होण्याचा धोका वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोल खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांचा संताप वाढला आहे.

रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते. अंधारात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. अर्धवट दुरुस्ती करून उर्वरित रस्ता दुर्लक्षित का ठेवण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. “पुढच्या गावांचा रस्त्याशी संबंध नाही का?” असा रोखठोक प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.

स्थानिकांच्या मते, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण न करता फक्त अर्धवट भागावरच काम केल्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दर्जेदार व संपूर्ण काम तातडीने हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अमळनेर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था झाल्याचे चित्र असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ मंगरूळ-शिरुडच नव्हे तर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा व्यापक आराखडा तयार करण्याची मागणीही जोर धरत आहे.

नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ गैरसोयीचा नसून थेट जीविताशी संबंधित आहे. वेळेत दखल न घेतल्यास अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता पूर्ण क्षमतेने दुरुस्त करणे गरजेचे बनले आहे.


Protected Content

Play sound