जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संदीप सुदाम तिरमली (वय-३६, रा. शिरसगाव ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ५ वर्षीय चिमुकलीवर ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराशेजारीच मुलींमध्ये खेळण्यासाठी गेली असता संदीप सुदाम तिरमली या नराधामाने या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून हातात दहा रूपयाच्या तीन नोटा देवून घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडत रडत घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संदीप यास याबाबत हटकले असता तो पळून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आई वडिलांच्या फिर्यादीवरून संदीप सुदाम तिरमली याच्या विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिमुकलीवर अत्याचार करणारा संदीप तिरमली हा घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलीसांनी त्याला अवघ्या दोन तासात अटक केली होती. सदर खटल्याची सुनावणी ही अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकिय अभियोक्ता केतन ढाके यांनी एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सदर कामातील तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद करण्यात आला. संदीप सुदाम तिरमली याला दोषी ठरवत आरोपीस पोक्सो कायद्यांतर्गत नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.