यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वर्षीय चिमुकली रत्ना सतीश ठेलारी हिचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गेल्या महिनाभरात यावल तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनिल भिलावे, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व श्री. स्वप्निल फटांगरे आणि यावल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
चिमुकलीवर हल्ला झाला होता, त्या परिसरात वनविभागाने तातडीने चार पिंजरे लावले होते. जळगावचे मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि अमन गुजर यांच्या सहकार्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यश सागर आणि वनपाल गणेश गवळी (शूटर) यांना पिंजऱ्याजवळ तैनात करण्यात आले होते.
गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या त्या भागात पोहोचला. वनपाल गणेश गवळी यांनी अचूक नेम साधत बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. काही अंतरावर बिबट्या गवतामध्ये बेशुद्ध पडल्यानंतर थर्मल ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला आणि लागलीच त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
सदर बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यशस्वी कारवाईनंतर सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी सांगितले की, अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अशा घटना घडतात, तेव्हा नागरिकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे असते. नागरिकांनी कोणताही अडथळा निर्माण न करता वनविभागाला त्यांचे काम करू दिल्यास वन्यप्राण्याला जेरबंद करणे किंवा त्याचा मागोवा घेणे लवकर शक्य होते.