अमळनेर प्रतिनिधी । शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याच्या पालकांना एक झाड तरी लावण्याची सक्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे व तालुका अध्यक्ष श्रीनाथ पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे पत्रकाद्वारे अनोखी मागणी केली आहे. या पत्रकात असे म्हटले आहे की, पहिली मध्ये प्रवेश घेताना मुलाच्या नावाने घराशेजारी वा परिसरात एक झाड लावावे. सोबतच त्याचा एक फोटो असावा. दरवर्षी शाळेत झाडाबद्दलचा अहवाल सादर करावा. इयत्ता दहावी पर्यंत ते झाड जगवले जावे. तसेच हे झाड यशस्वीपणे वाढविणार्या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीच्या परीक्षेत वीस गुण बोनस म्हणून द्यावे. अशा रीतीने उपक्रम राबवला झाडे मोठ्या प्रमाणावर जगतील. महाराष्ट्र शासनाने या गोष्टीचा विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या पत्रकावर जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाने व तालुका अध्यक्ष श्रीनाथ पाटील ,शहराध्यक्ष सुनील शिंपी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.