मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप तसेच रब्बी उत्पादक शेतकरी हा पूर्णतः हवालदिल झालेला असून मागील वर्षी पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली होती परंतु त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मात्र कोणताही फायदा झाला नाही व आज रोजी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे जवळपास पूर्णतः नुकसान झालेली असून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नसल्यामुळे जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्याद्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यासह वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप, रब्बी पिके घेणारे सर्व शेतकरी हे पूर्णतः आर्थिक दुर्बल झालेले असून शेतीवरील वाढता खर्च हा शेतकऱ्यांना कर्जबाजारीच्या खड्ड्यात लोटत आहे. त्यातही हातात आलेल्या पिकाला भाव नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असल्याने कोणत्याही अटी शर्ती न लावता जिल्ह्यात सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.मागील वर्षीच्या हंगामात पावसाचा खंड पडल्यामुळे शासन व प्रशासनाने जिल्ह्यात जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केली होती परंतु त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणताही फायदा झाला नाही व शेतकरी शेतमालाचे हवे तसे उत्पन्न न मिळाल्यामुळे पुन्हा कर्जबाजारी झाला. त्याचा पुरावा म्हणजे शासनाच्या एक रुपयातील पिक विमा योजनेत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकरी उत्पन्नावर आधारित विम्यास पात्र झालेले आहे यावरूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था लक्षात येत आहे.
त्यातच या चालू पावसाळ्यामध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेला असून सततच्या पावसामुळे शेतीतून त्याच्या हातात काहीही उत्पन्न येणार नाही किंवा शेतीला लावलेला खर्च सुद्धा निघणार नाही अशी भयावह परिस्थिती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समोर उभी आहे.
त्यामुळे मागील वर्षीचा कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती व चालू वर्षीचा ओला दुष्काळ व त्याचे होणारे पंचनामे असा असे कागदी घोडे न नाचवता जिल्ह्यात संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा जेणेकरून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत होईल. महाराष्ट्र शासन कर्जमाफीच्या विविध योजनांची घोषणा या आधी सुद्धा केलेली असून त्यातील जाचाक अटीमुळे कर्जमाफी योजनेचा लाभ क्वचितच शेतकऱ्यांना मिळतो व बहुतांश शेतकरी हा अटी शर्तीच्या भानगडीत कर्जमाफीच्या योजनेला अपात्र होतो.
तरी सरकार हे शेतकऱ्यांचे असल्याच्या घोषणा विविध जाहिराती मधून वारंवार करत असून तसा प्रत्यक्षात अनुभव मात्र आजतागायत शेतकऱ्यांना आल्याचे दिसून येत नसल्याने सरकारने २००८ पासून आजतागायत कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारीद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.