



रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून कचरा संकलनाची व्यवस्था विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या व्यक्तीकडून मजुरांना वेळेवर पगार मिळत नसल्याने संबंधित मजूर संपावर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे घराघरात कचरा साचून राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कचरा संकलन बंद झाल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये घरगुती कचरा जमा झाला आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना कचरा घरातच ठेवावा लागत असून, काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आपले वाहन कचरा संकलनासाठी उपलब्ध करून दिले. मजुरांच्या मदतीने कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांमधून कचरा गोळा करण्यात आला. नगरसेवकांनी स्वतः वाहन लावून कचरा उचलल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याबाबत नगरसेवक पद्माकर महाजन यांनी सांगितले की, मागील वर्षी कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या व्यक्तीकडून मजुरांना वेळेवर पगार देण्यात आला नसल्याने संपूर्ण मजूर संपावर गेले आहेत. त्यामुळे कचरा संकलनाचे काम प्रभावित झाले असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून रोजंदारीवर मजूर लावून कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करून कचरा संकलन सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी शहरातील सर्व भागांमध्ये नियमित कचरा संकलन होण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. मजुरांचा पगार आणि कचरा संकलन ठेक्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मजुरांच्या संपावर लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि शहरातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पद्माकर महाजन यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मनुष्यबळाच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



