Home क्राईम रावेर पोलिसांची कारवाई! शेतातील वीजतार चोरीप्रकरणी विवरे येथील दोघे जेरबंद ; २६...

रावेर पोलिसांची कारवाई! शेतातील वीजतार चोरीप्रकरणी विवरे येथील दोघे जेरबंद ; २६ किलो तार जप्त

0
81

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोर ते अजंदा रस्त्यालगत शेतशिवारातील विद्युत खांबांवरून अॅल्युमिनियमच्या वीजतारा चोरी करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात विवरे येथील एका भंगार व्यावसायिकाने चोरीच्या मालापैकी २६ किलो वीजतारांचे तुकडे पोलिसांकडे काढून दिले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

रावेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी  ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अग्रवाल पॉवर प्रा. लि. येथे साइट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र रामदास ठाकूर (रा. भादली, ता. जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मध्ये भोर ते अजंदा रस्त्याजवळील विद्युत खांबांवरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या वीजतारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; मात्र घटनास्थळ शेतशिवारात असल्याने त्यातून उपयुक्त माहिती मिळत नव्हती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवारातील मोटारपंप आणि वीजतारा चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेंतर्गत परिसरातील भंगार दुकाने, सराईत चोर आणि हिस्ट्रीशीटर यांची तपासणी करण्यात आली. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना रावेर-अजंदा रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी पाठविले. पथकाला जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी हे दोघे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे वीजतारा कापण्यासाठी वापरले जाणारे कटर आणि पक्कड मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघांना रावेर पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, वीजतारा चोरी करण्याच्या उद्देशाने ते परिसरात आल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. यापूर्वी दोन ते तीन महिन्यांपूर्वी भोर ते अजंदा रस्त्यावरील वीजतारा चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या तपासादरम्यान विवरे गावातील एका भंगार व्यावसायिकाकडून चोरीस गेलेल्या मालापैकी २६ किलो वीजतारांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनी यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, तसेच शेतशिवारातील वीजतारा आणि मोटारपंप चोरीच्या अन्य घटनांशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान ठाकूर आणि पोलीस कर्मचारी विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील व रुबाब तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.


Protected Content

Play sound