मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या संभाव्य मोठ्या राजकीय घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत शहरातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावरही संभाव्य पक्षप्रवेशांच्या चर्चांनी जोर धरला आहे.
साधारण कार्यकर्त्यांपासून ते मातब्बर नेत्यांपर्यंत अनेक जण पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. ग्रामपंचायत सदस्य, माजी व विद्यमान पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या नावांचीही विविध राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मुक्ताईनगरच्या राजकारणात यापूर्वीही पक्षबदलामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा काही नेते व पदाधिकारी पक्षाची साथ सोडणार का, तसेच कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, संभाव्य पक्षप्रवेशांबाबत अद्याप कोणत्याही संबंधित नेत्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना केवळ राजकीय तर्क-वितर्कांचे स्वरूप आहे. पुढील काही दिवसांत प्रत्यक्षात कोणते नेते किंवा पदाधिकारी पक्षांतर करतात, यावरच या चर्चांची सत्यता स्पष्ट होणार आहे. सोशल मीडियावरही या संभाव्य राजकीय घडामोडींबाबत विविध चर्चा आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे “कोण जाणार? कोण येणार? आणि कोणत्या पक्षाचे राजकीय समीकरण बदलणार?” याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे.



