दिल्ली वृत्तसंस्था । देशातील सर्वात मोठी “महिंद्रा अँड महिंद्रा” कार उत्पादक कंपनीमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष पद सोडणार असल्याची घोषणा महिंद्रा समूहाने आज केली आहे. आनंद महिंद्रा हे कंपनीचे अध्यक्षपद सोडणार असून येत्या १ एप्रिल २०२० पासून ते अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे यावेळी सांगण्यात आले आहे.
महिंद्रा समूहाचे बरेच अधिकारी येत्या १५ महिन्यांत निवृत्त होतील. हे लक्षात घेता कंपनीत हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल १ एप्रिल २०२० पासून होणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने या बदलाला मंजुरी दिली आहे. पवन कुमार गोयंका यांचा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. जो १ एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, अनिश शाह १ एप्रिल २०२० पासून मंहिद्रा समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम पाहतील. तर २ एप्रिल २०२१ पासून अनिश शाह कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होतील. ते ३१ मार्च २०२५ पर्यंत या पदावर राहतील.