मविआच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार देण्याचा महायुतीचा डाव : खा. प्रतापगढी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुतीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरुद्ध अपक्ष व इतर उमेदवार उभे करण्याचा डाव महायुतीच्या राजकारण्यांनी खेळलेला आहे अशी टीका खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केली. मात्र जनतेने याला बळी न पडता महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर येथे झालेल्या सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार धनंजय चौधरी, चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, हरियाणाचे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दीपक लांबा, जम्मू काश्मीरच्या साइमा जान, इनायत उल्लाखान, कॉँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, हारून नदवी, माजी आमदार रमेश चौधरी, करीम सालार, मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, कॉँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, फैजपूरचे कुर्बान शेख, शब्बीर शेख, प्रल्हाद बोंडे, रमेश महाजन रोझोदा, योगिता वानखेडे, मानसी पवार, योगेश पाटील, राजू तडवी, सुनील कोंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जळगावचे माजी महापौर करीम सालार यांनी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारासाठी फैजपूर येथील फार्मसी कॉलेजजवळ प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी जम्मू काश्मीर येथून आलेल्या साइमा जान, इनायत उल्लाखान, हारून नदवी, करीम सालार, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, ज्ञानेश्वर बढे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी खासदार इम्रान प्रतापगढी यांनी भाजप सरकारवर टीका केली. सत्तेसाठी अपक्षांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मते फोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मतदारांनी जातपात, समाज न पाहता महाविकास आघाडीच्या पाठीशी मतांच्या माध्यमातून ताकद उभी करावी असे आवाहन खासदार प्रतापगढी यांनी यावेळी उपस्थितांना केले. रावेर-यावल मतदार संघातील मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा चौधरी यांनी केले.

गत काळात आमदार शिरीष चौधरी यांचे काम व समाज विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे धनंजय चौधरी यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रावेर यावल शाखेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशावरून उमेदवार धनंजय चौधरी यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र देण्यात आले आहे.

Protected Content